Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते अनिल मंद्रूपकर यांना राष्ट्रीय 'अटल राष्ट्र सेवा पुरस्कार' प्रदान

 



सोलापूर - गेल्या ४७ वर्षांपासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे सोलापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लायन अनिल मंद्रूपकर यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या 'अटल राष्ट्र सेवा पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित भव्य सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रकवी दिवंगत रामधारी सिंह 'दिनकर' स्मृती न्यास, नवी दिल्ली यांच्या वतीने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० मान्यवरांमध्ये मंद्रूपकर यांचा समावेश होता.


अनिल मंद्रूपकर यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात १९७९ मध्ये सोलापुरातून झाली. गुजरातच्या मोरबी येथील पूरग्रस्तांसाठी निधी उभारून त्यांनी समाजसेवेचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून आजवर त्यांनी भारतभरातील ६ राज्यांमध्ये आपले कार्य विस्तारले आहे.वक बिरादरी, लायन्स इंटरनॅशनल, वनराई, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, कमिन्स इंडिया फाउंडेशन, आशीर्वाद वृद्धाश्रम आणि स्नेहक्षितिज अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.२१ व्या शतकातील ग्लोबल वॉर्मिंगचे संकट ओळखून त्यांनी २००६ मध्ये पुण्यात पहिला 'पर्यावरण लायन्स क्लब' स्थापन केला. ३आर (3R) तत्त्व आणि स्वच्छतेबाबत त्यांनी ग्रामीण व शहरी भागात जनजागृती केली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ गावांमध्ये शौचालय ब्लॉक्स बांधण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे २००८ मध्ये आर्वी गावाला 'राष्ट्रपती पुरस्कार' मिळाला होता.


केवळ संस्थात्मक काम न करता, वैयक्तिक पातळीवरही मंद्रूपकर गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देतात. कॉलेज फीपासून ते रोजगारापर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. धाराशिव येथील अंजली साखरे या विद्यार्थिनीला अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी केलेली मदत हे त्यांच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.पुरस्काराला उत्तर देताना मंद्रूपकर म्हणाले की, "कमिन्स इंडियामधील ४० वर्षांच्या सेवेदरम्यान आणि त्यानंतरही मला विविध संस्थांचे व मित्रांचे सहकार्य मिळाले. 'विकसित भारत मिशन'साठी माझे सामाजिक कार्य यापुढेही अविरत सुरू राहील."मंद्रूपकर यांच्या या यशाबद्दल सोलापूर आणि पुण्यातील नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments