सोलापूर - सोलापूरमध्ये एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. बोरामणी नाका येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज २७ मार्च २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.मृत झालेल्या दोघांची नावे आहेत – सैफन शेखफरीद पटेल (वय ४० वर्ष) आणि हुजूर अलाउद्दीन पटेल (वय ३६ वर्ष). दोघेही बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी होते.
दोन्ही मित्र भटारी (जेवण बनवण्याचे) काम करत होते. एका ऑर्डरसाठी ते सोलापुरात आले असताना हा अपघात घडला. ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले
घटनेची माहिती मिळताच दोघांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सैफन शेखफरीद पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, पाच बहिणी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. तर हुजूर अलाउद्दीन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि गावकऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली.
या अपघातामुळे सोलापूर शहरात एकदा पुन्हा जड वाहतुकीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे

0 Comments